नवी दिल्ली - महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल ३ डिसेंबरपासून दिल्लीत उपोषणाला बसल्या आहेत. त्यांची शुक्रवारी निर्भयाच्या आई-वडिलांनी भेट घेतली. त्यांनी स्वाती यांना उपोषण संपवण्याचे आवाहन केले असून यासंदर्भात केंद्र सरकारलाही पत्र लिहिले आहे.
गेल्या 11 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र सरकारकडून स्वाती यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही ही दुर्देैवाची बाब आहे. देशातील निर्भयाला तर आम्ही वाचवू शकत नाही. मात्र त्यांच्यासाठी लढणाऱ्या वाचवणे आमचे कर्तव्य आहे, अशा भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केल्या आहेत.
सरकारने आपले मौन तोडून स्वाती यांची भेट घ्यावी. स्वाती या देशातील लाखो महिलांची लढाई लढत आहेत. गेल्या 11 दिवसांपासून त्या उपोषण करत आहेत. मात्र सरकारकडून त्यांची विचारपूस करण्यात आली नाही. त्यांची ही परिस्थिती आम्ही पाहू शकत नाहीत. मी केंद्र सरकारला विनंती करते की, त्यांनी स्वाती यांच्या मागण्या मान्य करून उपोषण संपवावे, असे निर्भयाच्या आईने केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
दिवसेंदिवस मालीवाल यांची प्रकृती खालावत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि पुरुष राजघाटवर गर्दी करत आहेत. मालीवाल यांच्या शरीरातील साखरेची पातळी खालावली आहे. तब्येत ढासळत असली तरी सरकारकडून त्यांना अद्याप कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.