नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याला सोडून इतर तीन आरोपींना फाशी देता येईल, असा अहवाल तिहार तुरुंग प्रशासनाने सादर केला आहे. आरोपी विनयने काल (गुरूवार) राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती.
तसेच, या प्रकरणातील आणखी एक आरोपी, पवन गुप्ताने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. ज्यावेळी हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे, आपल्यावर त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याने केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू होती. या खंडपीठाने त्याची मागणी फेटाळत, त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी पवनने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
दरम्यान, काल (गुरूवार) आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी एक फेब्रुवारी या फाशीच्या तारखेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. दिल्ली तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार, एकाच प्रकरणात दोषी असलेल्या सर्व आरोपींना शिक्षा निश्चित झाल्यानंतर, आणि त्यांचे सुटकेचे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाल्यानंतरच सर्वांना फाशीची शिक्षा देता येते. यामधील एकाही आरोपीबाबत निर्णय बाकी असेल, तर इतरांनाही फाशी देता येत नाही. या नियमाचा हवाला देत, सिंह यांनी एक फेब्रुवारीला होणाऱ्या शिक्षेवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती.
हेही वाचा : निर्भया प्रकरण : दोषी अक्षयचे क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले