नवी दिल्ली - दिल्लीतील पटियाला न्यायालयाने निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची तारीख जाहीर करण्यास नकार दिला आहे. गुरुवारी केंद्र सरकार आणि तिहार तुरुंग प्रशासनाने न्यायालयाकडे दोषींना फाशी देण्याची तारीख जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे निर्भयाच्या गुन्हेगारांना नक्की कधी फाशी होणार ही बाब अद्याप अस्पष्टच राहिल्याचे दिसत आहे.
या आधी देण्यात आलेल्या दोन तारखा टळल्या आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 11 फेब्रुवारीला होणार आहे. दोषींना कायद्यानुसार जगण्याचा अधिकार आहे तोपर्यंत जगू द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
डिसेंबर २०१२ मध्ये २३ वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी ११ मार्च २०१३ मध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.
हेही वाचा - बोडो शांतता कराराने आसाममध्ये नवी पहाट उजाडेल; बोडोलँडला दीड हजार कोटींचे पॅकेज