ओंगोले - आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात पोलिसांनी नेल्लोर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 9 लोकांना अटक केली आहे. या मुलीला तिच्या नातेवाईकानेच वेश्याव्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सय्यद सलमान (वय 24), कटरागड्डा शिवा कुमार (वय 24), उन्नाव नवीन (वय 31), बुरामेट्टी रवि तेजा (वय 24), गोंडी वामसी कृष्णा (वय 24) कोंडामुरसुपालम, कासिरेड्डी ब्रह्मा रेड्डी (वय 25), धन्यासी देव प्रकाश (वय 24), रावुरी अरविंद (वय 25) आणि कोमातला येदुकोंडालू (वय 30) यांना अटक केली आहे.
हे प्रकरण 18 जुलैचे आहे. यात पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर कंडुकुर मंडल येथील मडवापुरम गावातील एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. येथे एक अल्पवयीन मुलगी अत्यंत वाईट अवस्थेत आढळली. तिच्याशी अनेक पुरुषांनी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले होते.
विजयवाडा येथील रहिवासी नादेन्धला माधवी हिने 27 हजार रुपयांमध्ये 5 दिवसांसाठी वेश्याव्यवसाय करण्यासाठी या अल्पवयीन मुलीला खरेदी केले होते. या मुलीच्या वहिनीशी तिने हा सौदा केला होता.
हेही वाचा - 'हिंदू शब्दामागे राजकीय संकल्पना नाही'
'माधवीने अल्पवयीन मुलीला नाडवापुरम गावात एका रिकाम्या घरात ठेवले आणि तेथे पुरुषांना पाठवले. आम्हाला 18 जुलैला एक सूचना मिळाली आणि आम्ही तातडीने त्या घरावर छापा टाकला आणि त्या मुलीला वाचविले. तसेच, 4 जणांना अटक केली,' असे प्रकाशमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या घराची मालकीण माधवी आणि अल्पवयीन मुलीची वहिनी यांना अटक करण्यात आली. मात्र, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पुरुषांना पोलीस तेव्हा पकडू शकले नव्हते.
प्रकाशम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ कौशल यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि कठोर कारवाई करत 9 संशयित आरोपींना पकडले. या संशयितांनी फोन पे अॅपद्वारे माधवीला पैसे पाठविल्यामुळे त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने पकडणे शक्य झाले.
सर्व 9 जणांना भारतीय दंड विधानाच्या कलम 342, 370 (4), 376 (2) आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिच्या मुलाने 'नीट' परीक्षा केली 'क्रॅक'