श्रीनगर - राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने (एनआयए) काश्मीरी फुटीरतावादी महिला नेता आसिया अंद्राबी हिच्या आर्थिक मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्यातील तरतुदींनुसार, अंद्राबी हिची मालमत्ता गोठवली आहे. तिचे निवासस्थान दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात आल्याने एनआयएने त्याला टाळे ठोकले आहे. मात्र, अद्याप येथे शोध मोहीम सुरू करण्यात आलेली नाही.
आसिया अंद्राबी हिला सध्या पोलीस कोठडीत आहे. ती दुखतारन-ए-मिल्लत या बंदी असलेल्या फुटीरतावादी संघटनेची प्रमुख आहे. तिच्यासह बंदी घालण्यात आलेल्या संघटना जेकेएलएफचा नेता यासीन मलिक, फुटीरतावादी नेता शबीर शाह आणि मुस्लीम लीगचा मसरत आलम हेही पोलीस कोठडीत असून त्यांची एनआयएकडून कसून चौकशी सुरू आहे.
'आसिया अंद्राबी परदेशातील काही संघटनाकडून पैसे घेत होती. या पैशांच्या बदल्यात ती ‘दुखतारन-ए-मिल्लत’ या आपल्या संघटनेमार्फत काश्मीर खोऱ्यात महिलांची आंदोलने घडवून आणत होती,' असे एनआयएच्या चौकशीदरम्यान अंद्राबी हिने मान्य केले आहे.
'२०११ नंतर मलेशियात अंद्राबीच्या मुलाला शैक्षणिक खर्चासाठी परदेशातील जहूर वाटाली (अहमद शाह) या हवाला एजंटच्या माध्यमातून पैसा मिळत होता. ही बाब तिच्या निदर्शनास आणून देण्यात आली. वाटाली हा हवालाच्या प्रमुख एजंटांपैकी एक असून त्याला पाकिस्तानकडून पैसा मिळतो,' असे एनआयएने म्हटले आहे.