भोपाळ - दहा लाख रुपये हुंडा दिला नाही म्हणून एका नवविवाहितेला तिहेरी तालक दिल्याची घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली. पीडित महिलेची तक्रार मिळताच पोलिसांनी महिलेच्या पती आणि दीराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ऑगस्ट महिन्यात नवरा आणि सासरच्यांनी हुंडा म्हणून तिच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. मात्र, तिने नकार दिल्यानंतर पतीने लगेच तलाक दिला, असे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
'ट्रिपल तलाक' विधेयक भारतीय संसदेने 30 जुलै 2019 रोजी कायदा म्हणून मंजूर केले. हा एक अजामीनपात्र गुन्हा असून या कायद्यानुसार गुन्हा करणाऱ्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा व दंड ठोठावण्यात येतो. हा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला वाजवी कारण असल्याशिवाय जामिनावर सोडले जाऊ शकत नाही.