नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनचरित्राचे शुक्रवारी (29 मे) अनावरण करण्यात आले. सहा वर्ष पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करत असल्याचे औचित्य साधून या चरित्राचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लहानपणीच्या दुर्मिळ फोटोंचा समावेश आहे, तसेच अनेक किस्से आणि आठवणी सांगण्यात आल्या आहेत.
'नरेंद्र मोदी हारबिंजर ऑफ प्रॉस्पेरिटी अॅन्ड अपोस्टल ऑफ वर्ल्ड पीस' असे या पुस्तकाचे नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश के. जी बालकृष्णण यांनी या पुस्तकाचे अनावरण केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ऑनलाईनच या पुस्तकाचा अनावरण सोहळा घेण्यात आला.
ऑल इंडिया बार असोशिएशनचे अध्यक्ष आणि इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ज्युरिस्टचे अध्यक्ष आदिश सी. अगरवाल आणि अमेरिकन लेखिका आणि कवयत्री एलिजाबेथ होरान या दोघांनी हे पुस्तक लिहले आहे. पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तीक आणि राजकिय जीवन प्रवासाचा धांडोळा घेण्यात आला आहे. लोकांना माहित नसलेले अनेक छोटे मोठे किस्से आणि घटना या जीवनचरित्रात मांडण्यात आल्या आहेत. हार्ड कॉपीसह ई-बुक 20 भाषांमध्ये उपलब्ध असून यातील 10 भाषा परदेशी आहेत. मराठीतही हे पुस्तक उपलब्ध आहे.