नवी दिल्ली - चीन, पाकिस्ताननंतर आता नेपाळही सीमा प्रश्नावरून वाद निर्माण करत आहेत. नेपाळमधील ओली सरकारकडून भारताविरोधी कारवाया सुरूच असून आता नेपाळने आपल्या पाठ्यपुस्ताकतही नवा नकाशा प्रकाशीत केला आहे. नेपाळच्या शिक्षण मंत्रालयाने माध्यमिक शिक्षणाच्या नवीन पुस्तकांमध्ये कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख हे नेपाळचा भाग असल्याचे दाखवले आहे.
नेपाळने 9-12वीच्या भूगोलच्या पुस्तकांमध्ये 'नेपालको भूभाग रा सीमासम्बन्धिनी स्वाध्याय सामग्री' ( नेपाळचे भूभाग आणि सीमासंबधित माहिती अभ्यासक्रम) अशा नावाच्या पुस्तकामध्ये कालापानी हा नेपाळचा भाग दाखवला आहे. भारताने लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी भागावर कब्जा केला असून हा नेपाळचा भाग आहे, असाही दावा या पुस्ताकांमध्ये करण्यात आला आहे. 11-12वीच्या या पुस्तकाची प्रस्तावना नेपाळचे शिक्षणमंत्री गिरिराज मणी पोखरियाल यांनी लिहली आहे.
काय आहे उत्तराखंडमधील भूभागाचा वाद?
नेपाळने उत्तराखंडमधील कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. त्यासाठी नेपाळने आपल्या नकाशामध्ये सुद्धा दुरुस्ती केली आहे. नेपाळची राज्यघटना (द्वितीय दुरुस्ती 2077) विधेयकामधील अनुसूचीच्या (Coat of Arms - शस्त्रास्त्रांचा कोट) आधारे नव्या अद्ययावत नकाशाला मंजुरी देण्यात आली. या राजकीय नकाशात लिमिपियाधुरा, कालापानी आणि लिपूलेख हे नेपाळचा हिस्सा असल्याचे दाखविण्यात आले आहेत.
राम जन्मस्थळावरून वाद - भारतात असलेली अयोध्या ही बनावट असून प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते, असे वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी केले होते. भारतात असलेली अयोध्या खरीखुरी नाही, असा दावा ओली यांनी केला होता. तसेच आपल्याला पंतप्रधानपदावरुन दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही ओली यांनी केला होता. तथापि, नेपाळमधील नेत्यांनी पंतप्रधानांच्या विधानाची थट्टा उडवल्यानंतर तेथील परराष्ट्र मंत्रालयाकडून सारवासारव करण्यात आली होती.
भारताची भूमिका - भारत आणि नेपाळ यांच्यात तीव्र राजनैतिक संघर्ष होण्याची शक्यता असून, कालापानीवरून भारताने नेपाळचा आरोप खोडून काढले आहेत. कृत्रिरिमरित्या सीमा वाढविण्याचा नेपाळचा दावा कधीही मान्य करण्यात येणार नाही, असे वक्तव्य भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. नेपाळ सरकार आता भारतविरोधी विचार नवीन पिढीमध्ये रुजवत असल्याची चर्चा आहे.