काठमांडू - भारतातून दररोज फळे आणि भाज्या घेऊन येणाऱ्या हजारो ट्रकला नेपाळ सरकारने बंदी घातली आहे. नेपाळ सरकारने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले आहे, की भारतातून येणाऱ्या फळांमध्ये आणि भाज्यांवर प्रमाणापेक्षा अधिक किटकनाशकांचा वापर केला जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार येथे मेंदुज्वराचा कहर पाहुन नेपाळच्या अधिकाऱ्यांनी भारतीय फळ आणि भाज्यांवर बंदी घातली आहे. बंदीमुळे भारत-नेपाळ सीमेवर फळे आणि भाज्यांचे हजारो ट्रक अडकून पडले आहेत. यामुळे व्यापारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. छोट्या व्यापाऱ्यांवर याचा परिणाम होत असून त्यांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. लॅब टेस्ट झाल्याशिवाय फळे आणि भाज्यांना नेपाळमध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी भुमिका नेपाळच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. नेपाळ सरकारने कृषी मंत्रालयाला आदेश देत उत्पादनाचे परिक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या मशीन बसवण्याचे आदेश दिले आहेत.
नेपाळमधील आर्थिक पत्रकारांचे अध्यक्ष आणि बिझनेस एडिटर पुष्प राज आचार्य यांनी यावर बोलताना म्हटले आहे, की भारतातील फळे आणि भाजी निर्यात करणारे आणि नेपाळमधील आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांचे उत्पादन व्यापार करण्यापूर्वी कोलकाता किंवा काठमांडू येथून प्रमाणित करुन घ्यायला हवे.