मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एल.जी.बी.टी समूहाला सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एल.जी.बी.टी ( लेस्बियन, गे, बायसेक्सुअल, ट्रान्सजेंडर) सेलची स्थापना करण्यात आली. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सेलच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. एलजीबीटी समुदायाचा पक्षातंर्गत सेल करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिलाच पक्ष ठरला आहे.
एल.जी.बी.टी समूहासमोर शिक्षण, आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले होते. हे वचन पूर्ण करण्यासाठी आज एक पाऊल पुढे टाकले आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
या सेलच्या माध्यमातून एल.जी.बी.टी समूहाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य दिले जाईल. एल.जी.बी.टी समुहाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी सेलद्वारे कार्यक्रम आखण्यात आला आहे, येत्या काळात हा कार्यक्रम यशस्वी करू, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस हा देशातील पहिला पक्ष आहे. ज्याने युवती सेलची स्थापना केली होती. आज राष्ट्रवादी काँग्रेस समलैंगिक समूह विभाग स्थापन करणाराही देशातील पहिला पक्ष ठरलाय. आम्ही कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत, म्हणून या सेलची स्थापन केली आहे. या सेलच्या माध्यमातून समलैंगिक समूहाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा उद्देश आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच सामाजिक न्यायमंत्री ना. धनजंय मुंडे यांनी समलैंगिक समूहाच्या प्रश्नांसाठी वेल्फेअर बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता, त्याबाबतही आगामी काळात पुढाकार घेणार, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात एल.जी.बी.टी समूह 10-12% आहे. त्यांच्या प्रश्नांची दखल समाजाकडून घेतली जात नाही, मात्र या सेलच्या माध्यमातून आम्ही त्यांची दखल घेऊ, समानता, रोजगाराबाबत पुढाकार घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणू, असा विश्वास सेलच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया पाटील यांनी व्यक्त केला.
सर्वसाधरणपणे राजकीय पक्षांमध्ये ओबीसी, एस-एसटी, महिला,अल्पसंख्याक असे वेगवेगळे सेल असताता. आपल्या समस्या ही सेल मांडतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रयत्नामुळे आता एलजीबीटी समुदायातील लोकांना एक व्यासपीठ मिळू शकणार आहे.