नवी दिल्ली - दिल्लीच्या हिंदूराव रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना गेल्या जुलै महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय परीक्षा बोर्डाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. बोर्डाचे अध्यक्ष प्राध्यापक पवनेंद्र लाल यांनी याबाबत हिंदूराव रुग्णालयाच्या प्रशासनाला एक पत्र लिहिले आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना तातडीने त्यांचे थकीत मानधन देण्यात यावे, असे बोर्डाने याबाबत सुनावले आहे. मानधन न मिळाल्यास रुग्णालयाची मान्यता रद्द करू, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.
या पत्रात म्हटले आहे की, पैसे नाही तर कामही नाही, या तत्वावर राष्ट्रीय परीक्षा बोर्ड विश्वास ठेवते. त्यामुळे रुग्णालयाने त्वरित मानधन द्यावे. मानधन मिळत नसल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला देखील आमचे समर्थन असल्याचे पवनेंद्र लाल यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा बोर्डाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे या डॉक्टरांना लवकरात लवकर त्यांचे मानधन देण्यात यावे, अशी सूचना या पत्रातून करण्यात आली आहे.