पाटणा - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारच्या लखीसरय या नक्षलग्रस्त भागामध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी कागदांवर विविध घोषणा लिहून मुख्य रस्त्यावर फेकल्याचे आढळले आहे. तर, पोलिसांनी दखल घेत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
लखीसराय जिल्हा मुंगेर लोकसभा मतदार संघात मोडतो. हा जिल्हा नक्षलप्रभावित असल्याने निवडणूक आयोगाच्या अतिदक्षता यादीत आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वीच येथे पोलिसांनी मॉकड्रील केले होते. मात्र, आज सकाळी येथे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी फेकेले पत्रके आढळले आहे.
त्या पत्रकांवर शहरातील लोकांना मतदानाचा बहिष्कार करण्याचे आवाहने केलेले दिसते. तसेच वोट मांगे तो चोट दो, वोटबाजों को कब्र दो सारख्या घोषणा त्यावर लिहिलेल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ ती पत्रके ताब्यात घेतले. त्यानंतर लोकांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
लखीसराय येथील पोलीस अधिक्षक कार्तिकेय कुमार यांनी येथे सुरक्षा आणि शांततेत निवडणुका पार पाडण्याचे आश्वासन दिले आहे. नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.