नवी दिल्ली - मुस्लीम समुदायाचा पवित्र रमजान सण आला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम धर्मगुरूंनी समाजाला घरातूनच रमजान साजरा करण्याचे, नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे.
जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर मात देण्यासाठी कोणताच उपाय सध्या नाही. सुरक्षित अंतर राखणे हाच त्यापासून बचावाचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे बांधवांनी घरातूनच नमाज अदा करावे, असे जमियत उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अर्षद मदनी यांनी सांगितले.
शरीयतनुसार मानवी जीवन खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे रमजान दरम्यान घरातूनच नमाज पडावे. सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे. घरातून नमाज पडले तरी मशिदीत जाऊन नमाज अदा केल्याप्रमाणेच पुण्य मिळेल. प्रशासनाच्या सूचनांचे सगळ्यांनी पालन करावे, असे इस्लामी फिकह सचिव मौलाना सैफुल्लाह रहमानी यांनी सांगितले.
लॉकडाऊनचे पालन करत कोणीही एकत्र जमू नये. कोरोनाशी सामना करण्यासाठी एकमेकांपासून शारीरिक दूर राहणे गरजेचे आहे, असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरैन रहमानी यांनी सांगितले. यासह इतरही काही मुस्लीम धर्मगुरूंनी समाजाला घरातूनच नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे.