नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा उद्या (दि. ३० मे) राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला देश-विदेशातील आमंत्रित नेत्यांपैकी काहींनी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही नेते या सोहळ्याकडे पाठ फिरवणार असल्याचे समजते.
नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भव्य शपथविधी सोहळा आयोजीत केला होता. त्या सोहळ्यासाठी अनेक देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले होते. देशातील दिग्गज नेत्यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आमंत्रण न दिल्याने तो सोहळा विशेष चर्चेत राहिला होता.
यावेळी मात्र मोदींचा शपथविधी सोहळा गेल्यावेळच्या तुलनेत साध्या पध्दतीने आयोजित करण्यात आला आहे. देशातील दिग्गज नेत्यांसह प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शिवाय बिम्सटेक संघटनेचे सदस्य असलेल्या श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, भूटान, थायलंड, बांग्लादेश आदी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण देण्याचे मोदींनी टाळले आहे.
दरम्यान, या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी नेत्यांसह देशातील प्रमुख पक्षांच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्यासह बॉलिवूडची दिग्गज मंडळीही उपस्थित राहणार आहे.
मोदींच्या या शपथविधी सोहळ्याला मात्र काही नेत्यांनी उपस्थीत रहणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ममतांनी भाजपसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे या सोहळ्यात उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. तर नवीन पटनाईक यांनी आजच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उद्या त्यांच्या विधानसभा सदस्यांचा शपथविधी असल्याने मोदींच्या शपथ विधीस उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मोदींना शपथविधीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.