नवी दिल्ली - अमेरिकेतील ह्युस्टन येथे झालेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमानंतर जगातील दोन महाशक्ती भारत-अमेरिकेतील मैत्री पाहण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. दोन्ही देशांचे प्रमुख नेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद यथे पुन्हा एकाच मंचावर येत आहेत.
मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमाला १ लाख २५ हजार नागरिक येणार असल्याची शक्यता आहे.
स्टेडियमच्या गॅलरीमध्ये १ लाख दहा हजार नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मैदानामध्ये अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांसाठी १० हजारांची आसन क्षमता आहे. कार्यक्रमादरम्यान शेकडो कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमावर संपूर्ण जगाची नजर असणार आहे.
स्टेडियमचे उद्धाटन करण्याआधी ट्रम्प आणि मोदी एका मोठ्या 'रोडशो'मध्ये सहभागी होणार आहेत. तब्बल दहा किलोमीटर लांबीचा हा रोड शो आहे. या कार्यक्रमानंतर ट्रम्प गांधी आश्रमात जाणार आहेत. तेथे चरखा चालवण्याबरोबरच 'वैष्णव जन' या भजनावर मोदी ट्रम्प तल्लीन होतील.