तिरुअनंतरपूरम - केरळमध्ये जगातील सर्वात मोठ्या बोटींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'नेहरू ट्रोफी बोट-रेस असे या थरारक स्पर्धेचे नाव आहे. सापासारख्या दिसणाऱ्या या बोटींना 'स्नेक बोट' असे म्हणतात. काळजाचा ठेका चुकवणाऱ्या या स्पर्धेमध्ये पल्लुतर्थी या बोट कल्बच्या 'नदुभगम' या टीमने ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अल्लापुझ्झा जिल्ह्यातील पुन्नमदा तलावामध्ये या स्पर्धा पार पडल्या.
७९ बोटींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये २३ बोटी स्नेक बोट प्रकारातील होत्या. यातील प्रत्येक बोटीवर ९० ते ११० नाविक स्वार असतात. १०० फुट लांबीच्या या बोटी पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. बोटींच्या या स्पर्धेला खूप जुना इतिहास आहे. गेल्या सात दशकांपासून ही स्पर्धा केरळमध्ये आयोजित केली जाते.
युबीसी बोट क्लबच्या चंबाकुलम या बोटीला मागे टाकत नदुभगम बोटीने प्रथम क्रमांक पटकावला. तर पोलीस बोट क्लबच्या करिचल चुंदन या बोटीने तिसरा क्रमांक मिळवला. नदुभगम संघाने आत्तापर्यंत दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
काल (शनिवारी) सकाळी ११ वाजता या बोटींच्या स्पर्धेला सुरूवात झाली होती. याशिवाय हीट ऑफ चंदन बोट आणि छोट्या नावांचीही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नेहरु ट्राफी बोट रेस करळमधील एक मानाची स्पर्धा आहे. दरवर्षी तिचे आयोजन करण्यात येते. मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी या स्पर्धेचे उद्धाटन केले.