बंगळुरू - आत्तापर्यंत आपण अनेक महिला कारागिरांना गणेश मूर्ती तयार करताना बघितले असेल. मात्र, एका मुस्लीम महिला कारागीराला गणेश मूर्तींना आकार देताना बघणे फारच दुर्मिळ. कर्नाटकातील हुबळीमध्ये अशीच एक मुस्लीम महिला सुंदर-आणि सुबक अशा गणेश मूर्ती तयार करत आहे. सुमन हवेरी असे या महिला मूर्तीकाराचे नाव आहे.
हुबळीच्या गोपानकोप्पा गावातील रहिवासी असलेले मूर्तीकार अरूण यादव यांचा मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे. काही दिवसांपूर्वी सुमन हवेरी या कामाच्या शोधात होत्या. अरूण यांनी त्यांना कारखान्यात काम करण्याची संधी दिली. कारखान्यातील इतर कारागिरांप्रमाणे सुमन देखील सुंदर गणेश मूर्ती साकारण्याचे काम करत आहेत.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना बंदी असल्याने कागद आणि शाडू मातीचा वापर करून मूर्ती तयार केल्या जातात. गणपती कारखान्यात काम करून सुमन यांनी दाखवून दिले आहे की, कोणत्याही समाजातील व्यक्ती कोणतेही काम करू शकतो. प्रामाणिक कष्टांना समाजाचे, जातीचे, लिंगाचे बंधन नसते याचे सुमन उदाहरण बनल्या आहेत.