भदोही - उत्तरप्रदेशमधील भदोही येथे मुस्लिम परिवाराने कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार आणि तेरावीही केली. मुस्लिम परिवाराने हिंदू कामगारासाठी केलेल्या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. याशिवाय मुस्लिम परिवाराचे कौतुकही होत आहे.
याबद्दल बोलताना इरफान अहमद खान म्हणाले, मुरारी गेल्या १५ वर्षापासून आमच्यासोबत होते. ते आमच्या घरात एका वृद्ध झालेल्या सदस्याप्रमाणे होते. यामुळे आम्ही घरच्या सदस्यांप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार केला. आम्ही जेंव्हा तेरावीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही ब्राम्हण भोजपूर्वी २२ जून रोजी केस कापण्याची प्रथा पाळली. २५ जून रोजी झालेल्या ब्राम्हण भोज कार्यक्रमात १ हजारापेक्षा जास्त हिंदू-मुस्लिम लोकांनी भाग घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरारी लाल श्रीवास्तव (६५) यांना विषारी जंतूने चावा घेतला होता. उपचारादरम्यान १३ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. मुरारी यांच्या घरात कोणीही नसल्यामुळे त्यांचा मृतदेह इरफान अहमद खान आणि फरीद खान यांना सोपवण्यात आला. दोघांनी सहकाऱ्यांची मदत घेताना हिंदू रितीरिवाजाप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार केला.