नवी दिल्ली - मुंबई विमानतळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने जीव्हीके ग्रुप आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड((MIAL) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाशी संबंधीत इतर आणखी कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाच्या कारभारात अनियमीतता आढळून आली असून हा घोटाळा 705 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागानेही(सीबीआय़) या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता ईडीने मनी लाँड्रीग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या आस्थापनातील संबधीत व्यक्तींनी वैयक्तीक मालमत्ता जमविण्यासाठी पैशाची अफरातफर केली आहे का? याचा तपास ईडीकडून सुरु आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, विमानतळ प्रशासन, जीव्हीके ग्रुप आणि इतर गुंतवणूकदारांनी अतिरिक्त खर्च दाखवून 705 कोटी रुपये दुसरीकडे हलविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड पीपीपी मॉडेलवर म्हणजेच पब्लिक प्राईव्हेट तत्वावर चालविण्यात येत आहे. विमानतळ प्रशासनाने खर्च फुगवून दाखवला तसेच दस्ताऐवजात बदल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
सीबीआयने एमआयएएलचे संचालक गणुपती आणि त्यांचा मुलगा जी. व्ही. संजय रेड्डी, कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच एमआयएएल कंपनी, जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि नऊ इतर खासगी कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 2006 साली एमआयएएलसोबत विमानतळाच्या अत्याधुनिकीकर, देखभाल आणि दैनिंदिन कारभार पाहण्यासाठी करार केला होता. या प्रकरणी सीबीआयने मुंबई आणि हैदराबादेत धाडी टाकल्या आहेत.