भुवनेश्वर - नायगड जिल्ह्यातील मुदुलिगाडिया या गावाला राज्यातील पहिले ईको व्हिलेज म्हणून मान मिळाला आहे. महानदी काठी वसलेल्या या गावाने नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पर्यावरणाचे संवर्धन केले आहे.
गावातील प्रत्येक घरी एलपीजी गॅसची जोडणी आहे. याचबरोबर गावामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले असून ठिकठिकाणी कचरापेट्या उभारल्या आहेत. या गावात प्लास्टिकचा वापर केला जात नाही. तसेच, प्रत्येक घरी शौचालय आहे.
पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी गाव सज्ज झालं आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी घरांच्या भिंतीवर वेगवेगळ्या सांस्कृतिक रांगोळ्यांची चित्रे येथील महिलांनी रेखाटली आहेत. गावाच्या विकासासाठी 33 जणांची टीम आहे.
2018 मध्ये पर्यटनाच्या माध्यमातून या गावाने एकून 1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मात्र, राज्य पर्यटन विभागाने या गावाला एकूण नफ्याच्या फक्त 10 टक्के निधी फायदा म्हणून दिला आहे. याहूनही आश्चर्य करण्यासारखी बाब म्हणजे गावाला 'ईको व्हिलेज'चा मान मिळाला असला, तरी येथे शिक्षणाची सोय उपल्बध नाही. त्यामुळे गावापासून काही अंतरावर शिक्षण घेण्यासाठी मुलांना जावे लागते. राज्याला महसूल मिळवून देणाऱ्या या गावासाठी आता शासनानेही काही पावले उचलावीत, असे गावातील लोकांचे म्हणणे आहे.