भुवनेश्वर - ओडिशाच्या मयूरभंज या आदिवासी जिल्ह्यातून आलेल्या दमयंती बेश्रा यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. त्यांनी संताली भाषेमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. दमयंती यांनी बऱ्यांच अडचणींना तोंड देत आपल्या आयुष्याला वेगळे वळण दिले.
दमयंती बेश्रा यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९६२ मध्ये, ओडिशाच्या आदिवासी-बहुल जिल्ह्यातील चोबेइजोडा गावात झाला. संताली भाषेमधील त्यांच्या संशोधनासाठी, आणि त्या भाषेच्या त्यांनी केलेल्या सेवेसाठी त्यांना हा सन्मान मिळत आहे. संताली भाषेसोबतच, त्या ओडिया भाषेमध्येही प्रवीण आहेत. लहानपणापासूनच त्यांनी संताली, आणि ओडिया भाषेमध्ये लिहायला सुरुवात केली होती. मात्र त्यांचे लग्न झाल्यानंतरच त्यांचं लिखाण प्रकाशित होऊ शकलं, असं डॉ. बेश्रा सांगतात. अर्थात, या कामात त्यांच्या पतीची आणि कुटुंबीयांची बरीच मदत त्यांना झाली.
दमयंती यांचा जन्म एका आदिवासी कुटुंबात झाला होता. त्यामुळे, त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. एका महिलेने स्वतःला कमकुवत न समजता, ठरवलेल्या वाटेवर पुढे चालत रहावे, असे त्या सांगतात. त्या म्हणतात, की भविष्यात काय होणार आहे, याची त्या काळजी करत नाहीत, तर वर्तमानात आयुष्य जगण्याला त्या प्राधान्य देतात.
आदिवासी भागातील महिलांबाबत बोलताना त्या म्हणतात, की आजही त्या महिला या शिक्षणापासून वंचित आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात भरीव कार्य होणे गरजेचे आहे.