नवी दिल्ली - रुग्णांना विविध आजारासाठी डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे एमआरआय करावे लागते. त्यासाठी रुग्णांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. मात्र, दिल्लीतील गुरुद्वारा बांग्ला साहिबमध्ये केवळ 50 रुपयात एमआरआयची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (डीएसजीएमसी) एमआरआयच्या सुविधांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. गुरुद्वारा परिसरातील असलेल्या गुरु हरिकृष्ण रुग्णालयात डायलिसीस केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र पुढील आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. या डायलिसीसच्या प्रक्रियेसाठी केवळ 600 रुपये खर्च येणार असल्याचे दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले. रुग्णालयाला 6 कोटी रुपयांच्या डायग्नोस्टिक मशीन दान करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चार या डायलिसीस आणि अल्ट्रासाऊंड, एक्स-रे आणि एमआरआयच्या मशीनचा समावेश आहे.
गरजुंना मॅग्नेटिक रेसोन्स इमेजिंग (एमआरआय) सेवा ही केवळ 50 रुपयात उपलब्ध होणार आहे. तर इतरांना एमआरआय स्कॅन हे 800 रुपयात उपलब्ध होणार आहे. गरजुंची निवड करण्यासाठी डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, खासगी लॅबमध्ये एमआरआयसाठी 2 हजार 500 रुपये खर्च लागतो. कमी उत्पन्न असलेल्यांसाठी एक्स-रे आणि अल्टासाऊंड केवळ 150 रुपयात करता येणार आहे. या मशिन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बसविण्यात येणार आहेत. येथील डायग्नोस्टिकचे दर देशात सर्वाधिक स्वस्त असल्याचे सिरसा यांनी सांगितले.