बुरहानपूर - मध्य प्रदेशात एका महिलेने राज्य महामार्गावर बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर 'जननी एक्सप्रेस' रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. मात्र, ती वेळेत पोहोचू न शकल्याने या महिलेला तिच्या पतीने दुचाकीवरून रुग्णालयात नेण्याचा मार्ग अवलंबला. मात्र, वाटेतच प्रसूती होऊन या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. कमलाबाई असे या महिलेचे नाव आहे.
'माझ्या सुनेला प्रसूती वेदना सुरू झाल्याचे आम्ही सहाय्यक परिचारिका दाईला (ANM - Auxiliary Nurse Midwife) कळवले होते. तसेच, गर्भवतीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेचीही मागणी केली होती. मात्र, रुग्णवाहिका आलीच नाही. यामुळे आम्ही तिला दुचाकीवरूनच रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिची वाटेतच प्रसूती झाली,' असे या महिलेची सासू चंद्राबाई यांनी सांगितले.
राज्य महामार्गावरच प्रसूती झाल्यानंतर कमला बाई यांना शाहपूर कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. येथे आई आणि अर्भकावर उपचार सुरू आहेत. 'महिलेच्या नातेवाईकांनी तिची रस्त्यातच प्रसूती झाल्याचे म्हटले आहे. ते नवजात अर्भकाला आणि आईला घेऊन रुग्णालयात आले होते. आम्ही त्यांना दाखल करून घेतले. आई आणि नवजात मुलीची प्रकृती चांगली आहे,' अशी माहिती रुग्णालयातील परिचारिका हंसाली बाघेल यांनी दिली.