नवी दिल्ली - मराठा आरक्षणाच्या बाबतीत आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. या निर्णयाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 'पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच'!! असे ट्विट केले आहे. तसेच त्यांनी सरकारी वकिलांचेही अभिनंदन केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के, तर, नोकर्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालत धाव घेताना अनेकांनी याचिका दाखल केल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे, त्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे.
संभाजीराजे आरक्षणाचा निकाल ऐकायला प्रथमच आज सुप्रीम कोर्टात गेले होते. शाहू महाराजांना अपेक्षित बहुजनांना एकत्र करणारा निकाल लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होती. महाराष्ट्र सरकारने देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज उभी केली असल्याचे संभाजीराजे म्हणाले.