भोपाळ - मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यात वैद्यकीय निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवजात अर्भकाला वैधता संपलेल्या लसीचा ( एक्सपायरी डेट) डोस दिल्यानं बालकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या बालकाच्या चेतासंस्थेवर विपरीत परिणाम झाला असून त्याचा उजवा हात काळा पडला आहे. अर्भकाचा हात काढून टाकण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
विदिशा जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली. २६ ऑगस्टला महिलेने एका बाळाला जन्म दिला होता. बालकाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डॉक्टरांनी अर्भकाला वैधता संपलेली लस दिली. त्यामुळे बाळाचा उजवा हात काळवंडला आहे'. या घटनेची जिल्हाधिकारी पंकज जैन यांनी दखल घेतली असून तपासाचे आदेश दिले आहेत.
'चेतासंस्थेवर परिणाम झाल्यानं बाळाचा उजवा हात काळा पडला आहे. मी भोपाळमधील हमीदी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी यासंबंधी चर्चा केली आहे. हात कापण्याची कदाचित वेळ येऊ शकते. तसेच हात नीट होण्याची शक्यता कमी असल्याचे जैन म्हणाले.
दरम्यान, विदीशा जिल्ह्याचे आमदार शशांक भार्गव यांनी आरोग्य खात्याचे प्रधान सचिवांना पत्र लिहले आहे. सरकारने उपचाराचा खर्च उचलावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
'बालकाच्या जन्मानंतर कुटुंबियांना त्याच्यापासून पाच दिवस दुर ठेवण्यात आलं होते. जेव्हा बाळाला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं, तेव्हा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळं अर्भकाचा उजवा हात काळा पडलेला होता. अर्भकाच्या उपचाराची व्यवस्था आता भोपाळ शहरात करण्यात आली आहे. मात्र, दोषी डॉक्टरांवर कारवाई व्हायला हवी. तसेच सरकारने या मुलाला दत्तक घ्यायला हवे, कारण रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बालकाच्या भविष्यावर परिणाम झालायं. वैद्यकीय निष्काळजीपणाची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना नाही. याआधीही रुग्णालयाच्या चुकीमुळे बालकांचे जीव गेले आहेत.