भोपाळ - मध्यप्रदेश पोलिसांनी 64 परदेशी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील काहीजणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सर्व लोक गेल्या महिन्यात दिल्लीतील तबलिगी जमातमध्ये भाग घेतल्यापासून राज्यात लपून बसले होते.
दरम्यान, निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांमुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर हे सर्व लोकं देशातील इतर भागांमध्ये प्रवास करून गेले व त्यामुळे कोरोनाचा प्रसार जास्त वाढला आहे.
तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून परतलेले लोकं जे राज्यात लपून बसले आहेत, त्यांनी 24 तासांच्या आत समोर येण्याचे आवाहन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे. तसेच समोर न येणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
तसेच या परदेशी तबलिगी लोकांना मस्जिदीमध्ये आश्रय देणाऱ्या 13 जणांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
हे सर्व परदेशी लोकं म्यानमार, इंडोनेशिया, फ्रान्स, बेल्जियम आणि किर्गिस्तानमधील असून ते तबलिगी जमातच्या कार्यक्रमासाठी भारतात आले होते.