बालाघाट - छत्तीसगढच्या बालाघाट जिल्ह्यातील समनापूर-बांधाटोला दरम्यान असलेल्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी पोलिसांनी प्लाटून-02चा सक्रिय सदस्य असेल्या ओसा ऊर्फ बादल या नक्षलवाद्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
दोन नक्षलवादी साध्या पोषाखात बांधाटोलाजवळील बाजारामध्ये पाहायला मिळाले. पोलिसांना एकाला पकडण्यात यश आले. मात्र, दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी नक्षलवाद्यांच्या 20 ते 25 जणांच्या गटाने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर पोलिसांना एका नक्षलवाद्यास पकडण्यात यश आले.
यात काही नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांची 6 पथके जंगलामध्ये शोध मोहिम राबवत आहेत. ओसा ऊर्फ बादल हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी असून त्याच्यावर 12 लाखांचे बक्षीस आहे.