हैदराबाद - एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज(शनिवार) पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला. 'देशामध्ये कोरोनाचा प्रसार झालेला असताना पंतप्रधान मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. विविध देशांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली, मात्र, आपले पंतप्रधान भाषण देतात. थाळी वाजवायला अन् दिवा लावायला सांगतात. त्यामुळे कोरोना कमी होणार आहे का'? असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.
'संसदेत कोरोनामुळे प्रश्नोत्तरांचा तास होणार नाही. मात्र, अशा परिस्थितीत विद्यार्थी नीट-जेईईची परीक्षा देऊ शकतात. संसदेत प्रश्नोत्तरांच्या तासात सरकार उत्तरे देणार नाहीत. विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे देता येतील. पण सरकारला नाही. अशा प्रकारे देशाचा कारभार सुरू आहे. मोदी मोराला दाणे खाऊ घालत आहे. ते पाहूनच खुश व्हा', असे ओवैसी म्हणाले.
'लोक अडचणीत आहेत. १८ लाख नागरिकांचा रोजगार गेलाय. लहान बालकांना पोलिओचा डोस दिला जात नाहीये. माध्यान्य भोजन योजना बंद आहे. कोरोना महामारीवर पंतप्रधानांनी अद्याप एकही पत्रकार परिषद घेतली नाही. जगातल्या प्रत्येक देशातील प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, मोदींनी पत्रकार परिषद घेतली नाही. फक्त व्हिडिओ जारी करत लोकांना ज्ञान देत राहिले. थाळी वाजावा, दिवे लावा, त्यामुळे कोरोना कमी झाला का'?
'दर दिवशी ७० ते ८० हजार कोरोनाचे रुग्ण देशात सापडत आहेत. मात्र, नरेंद्र मोदींना कोणीही विचारत नाही, थाळी वाजवल्याने किंवा दिवा लावल्याने काय झाले. सर्वांना पत्रकार परिषदेला बोलवू नका, ठराविक लोकांना तरी पत्रकार परिषदेत बोलवा. आम्हाला बरे वाटेल. सरकार जबाबदारी घ्यायला तयारी नाही, कोणी प्रश्न विचारायला नको. मोदी फक्त ज्ञान देत राहतात. त्याचा काहीही फायदा नाही', असे ओवैसी म्हणाले. आगामी बिहार निवडणुका लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.