श्रीनगर - जम्मूच्या दोडा जिल्ह्यामध्ये एका मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावामध्ये ही घटना घडली. आपल्या बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आईचाही मृत्यू झाला, अशी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिल्ली-पिंगल गावामध्ये राहणारी झरीना (१७) ही झरा ओलांडत असताना पाण्यात पडली. हे पाहताच तिची आई समीना बेगम (४३) यांनीही तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र दुर्दैवाने दोघीही या वाहत्या झऱ्यामध्ये वाहून गेल्या. पोलीस अधीक्षक राज सिंह गौरिया यांनी ही माहिती दिली.
या झऱ्यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. या गावकऱ्यांनीच पोलीस येण्याअगोदर मायलेकींचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. आम्ही बऱ्याच काळापासूुन इथे पक्का पूल बांधण्याची मागणी करत आहेत, मात्र प्रशासन सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी माहिती एका गावकऱ्याने दिली.
हेही वाचा : राजस्थानात कोरोनाशी लढणारी परिचारिका सहन करतेय शेजाऱ्यांचा रोष