नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत रोलोआ आघाडीला बहुमत मिळाले आहे. काल (दि. २४) नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सोपवला होता. सुत्रांच्या माहितीनुसार येत्या ३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
आज भाजप आणि रालोआच्या नवनिर्वाचीत सदस्यांची बैठक दिल्लीत पार पडली. यावेळी मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. सध्या मोदी हे देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत. सोळाव्या लोकसभेच्या निकालानंतर घेतलेल्या शपथविधीला मोदींनी अनेक देशांच्या प्रमुखांना निमंत्रण दिले होते. यावेळेसही तसाच विराट शपथविधी समारंभ आयोजित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेणारे मोदी हे ५ वे पंतप्रधान ठरतील. यापूर्वी पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनीही दोन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.
मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शहा यांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप अध्यक्षपदावरूनही ते पायउतार होणार असल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.