नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशियसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी संयुक्तपणे मॉरीशसमधील सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. पोर्ट लुईस येथे सर्वोच्च न्यायालयाची नवीन इमारत ही भारत-मॉरिशस सहकार्याचे आणि सामायिक मूल्यांचे प्रतीक, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
विकासाप्रती भारताचा दृष्टीकोन मानव-केंद्रित आहे. भारताला मानवतेच्या हितासाठी काम करायचे आहे. विकास भागीदारीच्या नावाखाली राष्ट्रांना अवलंबून राहण्यास भाग पाडले गेले होते. हे इतिहास सांगतो. त्यामुळे वसाहतवाद आणि साम्राज्यवादी राजवटीला चालना दिली गेली. भारतासाठी विकसित सहकाराचे मूलभूत तत्व म्हणजे भागीदारांचा सन्मान करणे, असे मोदी म्हणाले. दरम्यान मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
सर्वोच्च न्यायालयाची ही नवीन इमारत भारताच्या सहकार्याने उभारण्यात आली. ही इमारत भारतीय सहयोगाने उभारलेला मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस मधील पहिला पायाभूत सुविधा प्रकल्प असेल. मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या नवीन इमारतीत 26,000 चौरस मीटर क्षेत्राचा समावेश आहे. ज्यामध्ये 24 कोर्ट रूम आणि अत्याधुनिक उपकरणे तसेच दोन भूमिगत कार पार्किंगचा समावेश आहे. या नवीन पायाभूत सुविधांमध्ये तीन सहाय्यक न्यायालये, चार व्यावसायिक न्यायालये, औपचारिक बाबींसाठी एक न्यायालय आणि कौटुंबीक बाबींसाठी एक न्यायालय देखील असेल.