कोलकाता - पश्चिम बंगालच्या दुर्गापूर जिल्ह्यात मॉब लिंचिंगची आणखी एक घटना समोर आली आहे. 'तुझी जात काय आहे?' असे विचारत जमावाने एका व्यक्तीची हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव बिनोद आनंद आहे. दुर्गापूर ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यादरम्यान तो रुग्णालयातून पळून गेला होता. त्यानंतर, कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी जखमी अवस्थेत बिनोद पोलिसांना मिळाला. त्याला रुग्णालयात नेले असता, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सुरु असतानाच एक व्हायरल व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. ज्यामध्ये, काही लोक बिनोदला मारहाण करत, त्याला त्याची जात आणि धर्म विचारत होते.
मारहाण करणाऱ्या व्यक्तींना बिनोद आपण हिंदू असल्याचे सांगतानाही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मारहाणीदरम्यान झालेल्या जखमांमुळेच बिनोदचा मृत्यू झाला आहे. उपजिल्हाधिकारी अभिषेक गुप्ता यांनी तपास सुरु असल्याचे सांगितले.
हेही वाचा : मध्य प्रदेश हनीट्रॅप प्रकरण : एका आरोपीची अखेर पोलिसांसमोर कबूली..