भोपाळ - मध्यप्रदेशातील इंदोरमधील एका इन्स्टिट्युटमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांना बळजबरीने वर्गाबाहेर बसवून परिक्षा द्यायला लावले. या धक्कादायक घटनेनंतर काँग्रेस आमदार आरिफ मन्सूद यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना पत्र लिहून याप्रकरणी दोषींवर कारावाई करण्याची मागणी केली आहे.
आरिफ मन्सूर हे मध्य भोपाळ मतदार संघाचे आमदार आहेत. ‘इंदोर शहरातील नौलखा भागातील बेंगाली स्कूल 12 वीचे परिक्षा केंद्र आहे. या केंद्रावर इस्लामिया करिमिया शाळेचे विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी आले होते. 9 जूनला झालेल्या पेपरला मुस्लिम विद्यार्थ्यांना वर्गात येऊ दिले नाही’, असे मन्सूद यांनी पत्रात लिहले आहे.
‘विद्यार्थ्यांनी या विरोधात निदर्शने केल्यानंतर व्हरांड्यात बसून त्यांना परिक्षा देण्यास परवानगी देण्यात आली. जेथे सामाजिक सलोखा शिकवायला हवा, त्या विद्या मंदिरात द्वेष पसरविण्यात येत आहे’. दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.