गाझियाबाद (उत्तर प्रदेश) - मेरठच्या सरदनाचे आमदार संगीत सोम यांनी दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलीग-ए-जमातच्या मरकझ प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे. हा 'कोरोना दहशतवाद' पसरवण्याचा डाव आहे. तेथील मौलाना भारतविरोधी कारवाया करताहेत. त्यांनी कोरोनाबाधितांना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. संबंधित आरोपींना दहशतवादाच्या गुन्ह्याखाली शिक्षा द्यावी, अशी त्यांनी मागणी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गाझियाबादच्या कौशांबी परिसरात संगीत सोम राहतात. गेल्या काही दिवसांपासून ते लॉकडाउनचे नियम पाळत घरीच बसून आहेत. लॉक डाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशमधून जे लोक मरकझमध्ये सामील झाले होते, त्यांच्यावर दहशतवादाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. हा प्रश्न फक्त उत्तर प्रदेशच्या 18 जिल्ह्यांपुरताच मर्यादित नाही तर अंदमान-निकोबारपर्यंत कोरोनाचा धोका पद्धतशीरपणे पसरवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र दोषींवर दहशतवादाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, कारण कोरोनाची दहशत पसरवणारे दहशतवादीच आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.