नवी दिल्ली - कोरोनाविषाणूमुळे देशभरात 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आले असतानाही उत्तर प्रदेशमध्ये राजकीय घडामोडी सुरू आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मतदारसंघामध्ये 'आमच्या खासदार हरवल्या आहेत, अशा आशयाचे पोस्टर्स लागली आहेत. यातून सोनिया गांधींची मतदारसंघातील गैरहजेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
'चिठ्ठी ना कोई संदेश' जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेली रायबरेलीची खासदार इतकी गरीब निघाली की, खासदार निधी तर नाहीच. मात्र, आपुलकीचे दोन शब्दही बोलू शकल्या नाहीत. "तुम्हारा हाथ, नहीं हमारे साथ, सबसे बड़ी भूल, तुमको किया कबूल" अशा आशयाचे पोस्टर्स शहरात लागले आहेत.
पोस्टर्सवरून विरोधकांची मानसिकता प्रतिबिंबित झाली आहे. देश संकटात असताना ते राजकारण करत आहेत. सोनिया गांधी नेहमीच आपल्या मतदारसंघाशी जोडलेल्या असतात. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनासाठी निधी दिला आहे. लोकांना सत्य माहित आहे. या प्रकारच्या खालच्या पातळीवरील राजकारणामुळे त्यांच दिशाभूल होणार नाही, असे काँग्रेस नेते कमलसिंह चौहान म्हणाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज कुमार यांनी पोस्टर्स लावलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आणि जिल्हा प्रशासनाला याची दखल घेण्यास सांगितले आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची परंपरागत जागा आहे. सध्या सोनिया मतदारसंघाच्या खासदार आहेत. गांधी परिवाराचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रायबरेलीहून बहुतेक सर्व निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. यापूर्वी इंदिरा गांधींनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते.