गांधीनगर - गुजरातेतील अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॅन्सरग्रस्त व्यक्तीच्या मृत्यूबाबत आम्हाला रुग्णालय प्रशासनाकडून काहीच माहिती मिळाली नसल्याचा धक्कादायक आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयातील शवगृहात संबंधित व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर कुटुंबाला याविषयी माहिती मिळाली. मात्र, तोपर्यंत रुग्णाच्या मृत्यूविषयी काहीच माहिती रुग्णालयाने दिली नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. मृत्यू झालेला ५० वर्षीय व्यक्ती पोरबंदर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
माझ्या वडिलांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले होते. यानंतर त्यांना ४ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझ्या वडिलांच्या रिपोर्टविषयी मला फोन करून माहिती देण्यात येईल, असे मला रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते. मात्र, आठ दिवस उलटल्यानंतरही त्यांनी काहीच कळवले नाही, असे मृत व्यक्तीच्या मुलाने सांगितले. आपण दररोज रुग्णालयात जाऊन फोन नंबर दिला. मात्र, रुग्णालयाकडून काहीच सांगण्यात आले नाही, असेही त्यांनी सांगितले. एका स्थानिक राजकीय पक्षाच्या नेत्याची मदत घेतल्यानंतर सगळा प्रकार समोर आल्याचेही मृत व्यक्तिच्या मुलाने सांगितले.
दरम्यान, सदर व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयातील शवगृहात आढळला. माझ्या वडिलांचा मृत्यू 8 मे रोजी झाला असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच माझ्याबरोबर संपर्क होऊ न शकल्याने माहिती देता आली नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे, असेही मुलाने सांगितले.