नवी दिल्ली - 'नया पाकिस्तान'ने 'नयी सोच' बाळगून दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांवर कारवाई करावी, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भारताचे दुसरे विमान पाडल्याचे पाकचे म्हणणे आहे तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांना का दिले नाही?, असा प्रश्नही कुमार यांनी यावेळी उपस्थित केला. पाकिस्तानने भारताविरोधात 'एफ-१६' विमानाचा वापर केला. हे विमान विंग कमांडर अभिनंदन यांनी पाडले. 'एफ-१६' विमान अशाप्रकारच्या कारवाईत वापरणे हे नियम आणि अटींमध्ये बसते का याविषयी आम्ही यूएसएकडे विचारणा केली असल्याचेही कुमार यांनी सांगितले.
पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वत: 'जैश'नेच स्वीकारली आहे. तरीही पाकिस्तान हा दावा फेटाळत आहे हे खेदजनक आहे. हल्ल्याची जबाबदारी 'जैश' संघटनेने स्वीकारली नसून काही तरी गोंधळ झाला आहे, असे पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान जैश-ए-मोहम्मदला पाठिशी घालत आहे का?, असा प्रश्नही कुमार यांनी उपस्थित केला. करतारपूर कॉरिडॉरमुळे आम्ही अनेक गोष्टी मान्य केल्या कारण यामागे भारतीय शीख बांधवांच्या भावना होत्या, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.
नीरव मोदीच्या प्रत्यर्पणासाठी प्रयत्न -
पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचे इंग्लंडमधून भारतात प्रत्यर्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. मोदीच्या इंग्लंडमधील वास्तव्याबाबत आम्हाला माहिती आहे. आम्ही मोदीच्या प्रत्यर्पणासाठी इंग्लंड सरकारकडे मागणी केली असून ही विषय सध्या त्यांच्याकडे (इंग्लंड) प्रस्तावित आहे.