रांची - कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशातील उद्योगधंदे, व्यापार बंद असून लॉकडाऊनमुळे नागरिक घरांमध्येच बसून आहेत. या कठीण काळात उदनिर्वाहासाठी परराज्यातून आलेल्या मजुरांचा रोजगार गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. देशाच्या विविध राज्यात अडकलेले मजूर जीव धोक्यात घालून भर उन्हाळ्यात पायीच चालत घरी निघाले आहेत. कुणी पोलिसांना चुकवत रानावनातून, तर कोणी रस्त्यांने आणि रेल्वे रुळाच्या बाजूने पायी घरी निघाले आहेत. प्रवासात पोटाला अन्न कुठे भेटेल, काय भेटेल याची शाश्वती नाही. तरीही हा प्रवास सुरूच आहे. हैदराबादमधील स्थलांतरित मजुरांनी तब्बल १ हजार ३०० किमीचे अंतर कापत झारखंड गाठले. त्यांचा पायी प्रवास तब्बल ३९ दिवस चालला.
तेलंगाणातील हैदराबाद ते झारखंडपर्यंत प्रवास
सुमारे २० मजूर २ एप्रिलला हैदराबादवरून झारखंडला येण्यासाठी पायी निघाले. काल (शनिवार) सायंकाळी ते राज्यातील गुमला जिल्ह्यात पोहचले. सर्वांना रामगढ जिल्ह्यामध्ये जायचे आहे. गुमलामध्ये पोहचल्यानंतर प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी केली असून शिबिरामध्ये त्यांना ठेवले आहे. जर कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर प्रशासन त्यांना रामगढ राज्यात नेऊन सोडणार आहे. मात्र, त्याआधी तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त काळ त्यांना प्रवास केला.
कोणी वाहनचालक तर कोणी मजूर आणि हेल्पर
झारखंडमधून पोट भरण्यासाठी सर्वजण हैदराबादमध्ये आले होते. मात्र, लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वांचा रोजगार गेला. घरी जाण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांनी पायी घरी जाण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन असल्यामुळे तुरळक वाहनेच रस्त्यांवर दिसायचे. एखादी गाडी थांबली तर त्यात बसून २०-३० कि. मी. चा प्रवास व्हायचा. मात्र, पायीच जास्त चालावे लागले, असे मजुरांनी सांगितले.