झांसी - जिल्ह्यातील रक्षा पोलीस स्टेशन परिसरातील उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश सीमेवर स्थलांतरीत कामगारांनी गोंधळ घातला. त्यावर पोलिसांकडून कामगारांवर लाठीमार करण्यात आला आहे. सीमा ओलांडून पुढे जाऊ द्यावे, अशी मागणी कामगार करत आहेत.
रात्री 11 वाजल्यापासून उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश सीमा पूर्णपणे सील केली आहे, अशा परिस्थितीत सुमारे 20 किमी लांब वाहतूक कोंडी झाली आहे. भुकेल्या आणि तहानलेल्या अवस्थेत प्रवासी कामगार त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमवेत ट्रकमध्ये थांबले आहेत. प्रशासन कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासनाने प्रवासी मजुरांसाठी 2 गाड्या व अनेक बसेसची व्यवस्था केली आहे.
जिल्ह्यातील सर्व उच्च अधिकारी या वेळी उपस्थित असून स्थलांतरीत मजुरांना समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, कामगार त्यांचे ऐकण्यास तयार नाहीत. पोलिसांच्या विरोधात अनेक कामगारांनी जिल्ह्याच्या हद्दीत जबरदस्तीने वाहने घुसवण्याचा प्रयत्न केला आहे.
रात्री 11 वाजतापासून आम्ही सीमेवर अडकलो आहोत. आमच्यातील बर्याच जणांची प्रकृती बिकट झाली आहे, परंतु, यूपी पोलीस आम्हाला पुढे जाऊ देत नाहीत, असे कामगारांनी सांगितले.