लखनौ - उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर- सहारनपूर महामार्गावरुन बिहारला पायी घरी जाणाऱ्या मजूरांना वेगवान बसने चिरडल्याची घटना घडली. या घटनेत ६ मजूरांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवार रात्री उशिरा अपघात घडल्याचे पोलीसांनी सांगितले. सर्व मजूर बिहारमधील गोपालगंज येथे पायी चालले होते.
जखमींना मेरठ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण स्थलांतरीत मजूर असून बिहारमधील मूळ गावी चालले होते. या प्रकरणी पोलीस मजूर कोणत्या गावचे आहेत, त्याचा शोध घेत आहेत.
'महामार्ग ९ वरून पायी चालत जाणाऱ्या काही नागरिकांना बसने उडवल्याची माहिती आम्हाला रात्री ११ च्या सुमारास मिळाली', असे कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रमुख अनिल कापरवान यांनी सांगितले. 'घटनास्थळावरील इतरांनी आम्हाला हे सर्वजण स्थलांतरीत मजूर असल्याचे सांगितले. सहा जणांना रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. तर दोघांना मेरठला हलविण्यात आले आहे. या प्रकरणी वाहनचाल पळून गेला असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे', असे कापरवान
बस रिकामी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अडकलेल्या नागरिकांना माघारी आणण्यासाठी बस वापरली जात असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण इतर सर्व परिवहन मंडळाच्या बसेस बंद आहेत. वाहन चालकाला शोधण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे. घटनास्थळी वाहन चालकांच्या चपला, बॅगा आणि इतर साहित्य पसरले आहे.