नवी दिल्ली - सीएपीएफच्या उपाहारगृहांना सामान्य नागरिकांसाठी खुले केल्यानंतर, गृहमंत्रालयाने आता नवा आदेश जारी केला आहे. यानुसार आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या उपाहारगृहांमध्ये केवळ स्वदेशी वस्तू मिळणार आहेत. यासंबंधी वस्तूंची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने १३मे रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला होता. १ जूनपासून, म्हणजेच आजपासून हा आदेश लागू करण्यात येणार आहे. यानुसार, सीएपीएफच्या उपाहारगृहांमधील सुमारे ७० कंपन्यांच्या १,०२६ उत्पादनांची विक्री बंद करण्यात येणार आहे.
बंद केलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये काही भारतीय उत्पादनांचाही समावेश असू शकतो, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. डाबर, व्हीआयपी इंडस्ट्रीज, युरेका फोर्ब्स, जॅग्वार, एचयूएल (फूड्स), नेस्ले इंडिया अशा कंपन्यांच्या उत्पादनांवर सीएपीएफच्या उपाहारगृहांमध्ये बंदी आणण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एका भाषणामध्ये "लोकल" पदार्थांना "व्होकल" करण्याबाबत आवाहन केले होते. याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सीएपीएफच्या सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसफ, आयटीबीपी, एसएसबी आणि एनएसजी या सर्व संस्थांमधील उपाहारगृहांची वार्षिक उलाढाल ही सुमारे २,८०० कोटींच्या घरात जाते.
हेही वाचा : आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांविरोधातील कुठल्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही : पंतप्रधान मोदी