गाजियाबाद - गाजियाबादच्या इंदिरापुरम परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन मुलांसह त्यांच्या आईची गळा दाबून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. पतीवर हत्येचा आरोप असून तो फरार झाला आहे. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर असून नुकताच तो बंगळुरूहून परत आला होता.
आरोपीचे नाव सुमित असून त्याने पत्नी अंशु बाला आणि तीन लहान मुलांची गळा दाबून हत्या केली आहे. मोठ्या मुलाचे वय सात वर्ष आहे. मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या सुमितने काही दिवसांपूर्वी नोकरी गमावली होती. त्यामुळे तो तणावात होता आणि नुकताच गाजियाबादला परत आला होता.
रविवारी सांयकाळी त्याने परिवारातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर आज एक धक्कादायक पाऊल उचलणार असल्याचा मेसज टाकला होता. त्यामुळे त्याचे कुटुंबीय भयभीत झाले आणि त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तिला सुमितच्या घरी पाठवले. ती व्यक्ती घरी गेल्यानंतर घरातील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. दोन मुलांचे मृतदेह ड्रॉईंग रुममध्ये तर एका मुलाचा आणि पत्नीचा मृतदेह बेडरूममध्ये होता. यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. मृत पत्नी प्ले स्कूलमध्ये शिकवत होती आणि तिच्यामुळेच घर चालत होते. यामुळे पतीला अपमानित झाल्यासारखे वाटायचे.
घटनास्थळी फॉरेंसिक टीमला पाचारण करण्यात आले होते. या घटेनेचा तपास सुरू झाला आहे. पोलीस पती सुमीतचा शोध घेत आहेत. सुमितने स्वत: देखील धक्कादायक पाऊल उचलणार असल्याचा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला आहे. त्यामुळे सुमितचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.