पाटणा : बिहारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे बळी गेलेल्या एका व्यक्तीच्या मुलांनी स्वतःच त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेत नेऊन ठेवला. कारण, रुग्णवाहिका बोलावल्यानंतर ती आली होती, मात्र त्यात वैद्यकीय कर्मचारीच उपलब्ध नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणामध्ये गृह-विलगीकरणात असलेल्या एका ५० वर्षीय कोरोना रुग्णाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मुलाने रुग्णालयामध्ये फोन करुन रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर तब्बल ११ तासांच्या खटपटीनंतर त्यांना एक रुग्णवाहिका मिळाली. मात्र, या रुग्णवाहिकेमध्ये वैद्यकीय कर्मचारीच नव्हते.
स्वतःच खरेदी केले पीपीई किट..
विशेष म्हणजे, या रुग्णवाहिकेच्या चालकाने पीपीई किटदेखील घातला नव्हता. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून मृताच्या मुलांनी स्वतःच पीपीई किट खरेदी केला, आणि वडिलांच्या मृतदेहाला रुग्णवाहिकेत ठेवले.
घराचेही झाले नाही सॅनिटायझेशन..
आम्ही वारंवार फोन करत होतो, मात्र प्रशासनाने आमचे ऐकले नाही. ११ तासांनंतर मृतदेहालाही वास येऊ लागला होता. आता आम्हीच सगळे सोपस्कार पार पाडल्यानंतरही अजून आमचे घरही सॅनिटाईज करण्यात आले नाही; असे मृताच्या दोन्ही मुलांनी सांगितले.