इंदौर - अमली पदार्थ तस्करांचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशातील इंदौर पोलीस गुजरात आणि महाराष्ट्रात धरपकड करत आहेत. एमडीएमए या अमली पदार्थच्या तस्करी विरोधात इंदौर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी फिरोज आणि लाला या तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आणखी काही आरोपींना अटक करण्यासाठी इतर राज्यात धाडी टाकत आहेत.
गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक शहरात पोलिसांची पथके रवाना झाली असून गुप्त माहितीच्या आधारे तस्करांवर पाळत ठेवून आहेत. लवकरच मोठी सफलता मिळणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील फिरोज गँग आणि गुजरात सीमेवरील लाला गँगबरोबर सरदार खानचे संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांना तपासादरम्यान अनेक पुरावे हाती लागले आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरातमधील मोठे तस्कर पोलिसांच्या हाती लागतील, अशी माहिती मिळत आहे. सध्या महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध ठिकाणी पोलीस तस्करांच्या अड्डयांवर धाडी मारत आहेत. अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उघड होणार असल्याच्या वृत्ताला मध्यप्रदेशचे पोलीस महानिरिक्षक हरिनारायण चारी मिश्र यांनी सांगितले.
इंदौरमधून सुरू झाला तस्करांचा शोध
मागील काही दिवसांपूर्वी इंदौर शहरात अमली पदार्थ तस्करीचे अनेक गुन्हे समोर आले आहेत. पोलिसांनी नुकतेच ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. तसेच ५ जानेवारीला पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच तेलंगानातील हैदराबादमधूनही काही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर इंदौरमधील देवास शहरातून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ७० किलो एमडीएमए ताब्यात घेतले, या पदार्थांची बाजारात किंमत ७० कोटी होती.
मुंबई कनेक्शन -
मध्यप्रदेशात पकडण्यात आलेल्या आरोपींच्या माहितीनुसार इंदौर पोलिसांनी मुंबईतील कमाठीपूरा भागातील ड्रग्ज माफिया सलीम लाला याला पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र, तो फरार झाला. सध्या पोलीस विविध ठिकाणी छापे मारून आरोपींचा शोध घेत आहेत.