नवी दिल्ली - मरकझ प्रकरणातील मुख्य आरोपी मौलाना साद यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असा दावा साद यांच्या वकिलांनी केला आहे. आता हा अहवाल वकिलांच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला आज सोपविला जाईल. हा रिपोर्ट मिळाल्यानंतर क्राइम ब्रँचची टीम मौलाना साद यांना चौकशीसाठी पाचारण करू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार निजामुद्दीन येथील मरकझ प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ३१ मार्च रोजी गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी पहिल्यांदा मौलाना साद यांनी स्वत:ला क्वारंटाईन केल्याचे म्हटले होते. क्वारंटाईनचा काळ १५ एप्रिल रोजी संपला होता. या प्रकरणी चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी मौलाना साद यांना दोन नोटीस पाठवल्या होत्या. परंतु त्याचे कोणतेही समाधानकारक उत्तर मौलाना यांच्याकडून मिळाले नव्हते. त्यानंतर क्राइम ब्रँचने मौलाना साद यांची कोरोना टेस्ट करण्याची सूचना दिली होती.
कोरोना टेस्टची रिपोर्ट निगेटिव्ह
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्राइम ब्रँचच्या निर्देशानुसार मौलाना साद यांनी आपली कोरोना टेस्ट केली होती. याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मौलाना साद यांच्या वकिलांनी दावा केला आहे, की हा अहवाल निगेटीव्ह आला आहे. सोमवारी हा अहवाल पोलिसांनी सोपवला जाईल. मौलाना साद पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहेत.
लवकरच होणार चौकशी -
क्राईम ब्रँच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौलाना साद यांचा अहवाल मिळाल्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल. चौकशी दरम्यान त्यांच्या लावण्यात आलेल्या आरोपांसंबंधी माहिती मागितली जाईल. त्याचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पोलीस मौलाना यांना अटक करू शकते.