विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जवळील एका फार्मास्युटिकल कंपनीत सोमवारी रात्री स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
यासंदर्भातील माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. 90 टक्के आग विझवण्यावर नियंत्रण आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर या भीषण आगीनंतर या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा फार्मा सिटी कंपनीत जोराचा आवाज झाला. त्यानंतर ही भीषण आग लागली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीत विषारी वायू गळती झाली होती. त्यामुळे एका लहान मुलासह नऊ जणांचा मृत्यू झाला होता.
तसेच कर्नूल जिल्ह्यातील एसपीवाय कंपनीत 27 जूनला वायू गळती झाली होती. त्यात कंपनीच्या महाव्यवस्थापकाचा मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले होते. ही घटना नांदल्या भागात घडली होती. श्रीनिवासराव असे मृत महाव्यवस्थापकाचे नाव होते. कंपनीतील एका पाइपमधून अमोनिया वायूची गळती झाली होती. दुरुस्ती केलेला पाइपच फुटल्याने ही वायूगळती झाली होती. एसपीवाय ही कंपनी नंदी ग्रुपच्या मालकीची आहे.