बंगळुरू - 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा मोऱ्हक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यासाठी आमचा देश प्रयत्न करणार आहे, असे फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर जिग्लर यांनी सांगितले. येथील 'एरो इंडिया २०१९' या कार्यक्रमासाठी आले असताना ते बोलत होते.
मसूदला या यादीत टाकण्याचा फ्रान्सकडून आता दुसरा प्रयत्न होणार आहे. २०१७ मध्ये फ्रान्सने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी १२६७ क्रमांक समितीकडे अर्ज केला होता. मात्र, चीनने त्यावेळी खोडा घातला. " त्याला त्या यादीत टाकावे ही आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहोत" असे जिग्लर म्हणाले.
भारतासह इतर देशांनी मसूदला अनेकदा आतंरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी सुरक्षा परिषदेकडे मागणी केली आहे. मात्र, प्रत्येकवेळी चीन आडकाठी आणली आहे. चीनकडे सुरक्षा परिषदेचा 'विटो' अधिकार असल्याने त्यांची सहमती गरजेची आहे.
राफेल प्रकरणात मला काहीच घोटाळा झाला नसल्याचे दिसत आहे, असे ते म्हणाले. राफेल मुद्द्याविषयी त्यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर ते बोलत होते.