पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. पर्रीकरांचे राहणीमान साधे असले तरी ते एक मुरब्बी राजकारणी होते. त्यांच्या दूरदृष्टीचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे पर्रीकर हे पहिले असे नेते आहेत, ज्यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचे नाव सर्वात पहिले सुचवले होते.
त्यानुसार २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांचीच पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निवड झाली. पर्रीकरांनी गोव्यात चांगली कामे केली आहेत. त्यामुळे विरोधीपक्षदेखील त्यांचे कौतुक करतो. पर्रीकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळच्या लोकांपैकी एक होते. मोदींचे सरकार आल्यानंतर देशाच्या संरक्षणमंत्रीपदाचा विषय निघाला तेव्हा मोदींनी मनोहर पर्रीकरांना संरक्षण मंत्री केले.
पर्रीकर हे संरक्षणमंत्री असतानाच भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय जवानांनी या सर्जिकल स्ट्राईकने उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला होता. पर्रीकरांनी भारतीय लष्कराला बळकटी देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.