नवी दिल्ली - हरियाणाच्या गुरुग्राम येथील फैजापूरमध्ये मणिपूर येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय तरुणीला काही स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. हरियाणा सरकार मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्त गुरुग्राम यांना एनएचआरसीने नोटीस बजावली असून या संदर्भात चार आठवड्यांत सविस्तर अहवाल मागविला आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला पीडितेची सध्याची आरोग्य स्थिती आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवलेल्या वैद्यकीय उपचाराबाबत तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
चोंग होई मिसाओ असे तरुणीचे नाव आहे. ती मित्राच्या घरी दुपारच्या जेवणासाठी गेली होती. मात्र, घरी परत येताना तीला एका वयस्कर महिलेने थांबवले आणि कोरोना म्हणत शिवीगाळ केली. महिलेच्या कुटुंबीयातील लोकांनी तीला काठीने मारहाण केली.
काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी स्थानिकांवर कारवाई केली नाही. शिवाय, पोलिसांनी तीलाच तडजोड करायला सांगितले. त्यानंतर मिसाओने ईशान्य सहाय्य केंद्र व हेल्पलाईन (एनईएससीएच) वर कॉल केला. सायंकाळी साडेआठ वाजता नेशचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर एफआयआर नोंदविण्यात आला.