नवी दिल्ली - फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या अनेक जातींमध्ये आता राजकीय रंगही मिसळला जात आहे. बिहारच्या भागलपूरमध्ये अशोक चौधरी यांनी दीडशेहून अधिक जातीच्या आंब्यांचे उत्पादन केले. त्यांनी क्रॉस ब्रीडिंगद्वारे दोन विशेष प्रकारचे आंबे तयार केले असून त्या आंब्याचे नाव 'मोदी 1' आणि 'मोदी 2' असे ठेवले आहे.
बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात अशोक चौधरी यांच्या सुलतानगंज माहेशीच्या बागेतील आंबे प्रसिद्ध आहेत. आंब्याच्या गोडपणाचा संदर्भ म्हणून फळबागेला मधुबन असे नाव आहे. चौधरी यांनी वेगवगेळ्या प्रजातीच्या 150 आंब्याचे उत्पादन केले आहे. ते तब्बल 20 ते 25 हजार क्विंटल जर्दाळू आंब्याचे उत्पादन करतात.
देशातील लॉकडाऊनमुळे व्यवसायाचे नुकसान झाले आहे. पिकाची देखभाल करणे आवश्यक आहे, पण आता ते शक्य नाही. आंबा उत्पादनाची तयारी मार्चपासून सुरू होते आणि त्याच वेळी कोरोना विषाणू संकट आले. या परिस्थितीमध्ये आमचे जवळपास 50 टक्के नुकसान झाले, असे चौधरी म्हणाले. 2006 पासून बिहार सरकार दरवर्षी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर मान्यवरांना जर्दाळू आंबा भेट म्हणून देते.
लोकसभा निवडणुकीआधी अक्षय कुमारसोबतच्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंबा त्यांना आवडत असल्याचे सांगितले होते. यानंतर अनेक फळांची नावे मोदींच्या नावावर ठेवण्यात आली आहेत. यापूर्वी मोदी साडीची मोठी क्रेझ आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचे प्रिंट असलेल्या साड्यांची विक्रीही चांगल्या प्रमाणात झाली होती.